ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 जुलै: पाचोरा आणि भडगाव तालुक्याला प्रस्तावित चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याच्या हालचालींना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत मान्य केला जाणार नसून, गरज पडल्यास व्यापक जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी शुक्रवार 17 जुलै रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
माझी आमदारकी पणाला लागली तरी चालेल; मात्र मतदारसंघावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली. बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उपस्थित सर्वांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मांडलेल्या भूमिकेला एकमुखी पाठिंबा दर्शविला.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, चाळीसगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास त्यांचा कोणताही विरोध नाही. मात्र, पाचोरा–भडगाव मतदारसंघाला त्या कार्यालयाशी जोडल्यास येथील नागरिकांवर अन्याय होईल. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा व सत्र न्यायालय, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग आदी महत्त्वाची शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी असल्याने नागरिकांची विविध कामे सहजपणे पूर्ण होतात. अशा परिस्थितीत चाळीसगावशी जोडणी झाल्यास नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि वकील यांना अतिरिक्त प्रवास, आर्थिक भार आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागेल, असे त्यांनी नमूद केले.
या विषयावर यापूर्वी विभागीय आयुक्त, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर हा प्रस्ताव अयोग्य असल्याचे मान्य करून तो मागे घेण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पुन्हा एकदा हा प्रस्ताव पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने संपूर्ण मतदारसंघात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार –
या निर्णयाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना सामूहिक निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास जनआंदोलन, रस्ता रोको आणि जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिला.
हेही वाचा: वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी






