ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी, 27 जुलै: सातगाव डोंगरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी यंदाच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इयत्ता पाचवी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळा आणि गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थिनींनी मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या चार विद्यार्थिनींनी उत्कृष्ट गुणांची नोंद केली. तडवी आलीया हिने २०८ गुण मिळवत सर्वाधिक गुण प्राप्त केले. त्यानंतर पाटील देवयानी हिने १८४ गुण, तडवी कश्मिरा हिने १७८ गुण, तर फकीर आयशाबी हिने १५८ गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवले.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी गुणवंत विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विद्यार्थिनींची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
गुणवंत विद्यार्थिनींच्या या यशामागे मुख्याध्यापक जितेंद्र पाटील, केंद्रप्रमुख देविदास विसपुते तसेच पदवीधर शिक्षक समाधान गोलाईत, ज्ञानेश्वर भिसे, नंदकिशोर कदम, प्रशांत पाटील, श्रीराम वानखेडे, नितीन साळुंखे, हिम्मत पाटील, आशा मॅडम, सागर मॅडम, रमेश पाटील आणि महालपुरे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्या अशीच उज्ज्वल कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






