ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंपळगाव हरेश्वर (पाचोरा), 2 ऑक्टोबर: येथील हरेश्वर वाचनालयात ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य भिका गुरुजी होते.
कार्यक्रमात हरेश्वर वाचनालयाचे चिटणीस डॉ. वीरपालसिंग देशमुख यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, देशातील ५६५ संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण आणि देशाची एकता व अखंडता टिकवण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला. भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून त्यांनी बजावलेल्या भूमिकेचाही उल्लेख केला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन १९९१ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला. हरितक्रांती, विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश संशोधनातील प्रगती, तसेच १४ व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण यांसारख्या निर्णयांचा उल्लेख करण्यात आला. १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर आलेल्या मर्यादा आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना झालेल्या अटकसत्राचाही आढावा घेण्यात आला.
एनएसयूआय महाराष्ट्राच्या प्रदेश उपाध्यक्ष श्वेता पाटील यांनी आपल्या मनोगतात सरदार पटेल यांचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील योगदान आणि इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय व सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. वाचनालयाचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनीही दोन्ही नेत्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
यावेळी व्यासपीठावर हरेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष संजय पाटील, चिटणीस डॉ. वीरपालसिंग देशमुख, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष रवी गीते, चिटणीस यशवंत पाटील, माजी अध्यक्ष देविदास महाजन, अर्जुन जाधव, माजी सरपंच गीते सर, ग्रामविकास विद्यालयाचे माजी प्राचार्य बी. आर. महाजन, एस. एस. पाटील, उपप्राचार्य पी. ओ. चौधरी, अशोक पाटील, शांताराम चौधरी यांच्यासह वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल मिलिंद पाटील, सहाय्यक ग्रंथपाल गौरव पाटील, कर्मचारी बापू सपकाळ व सुनील सावळे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन वाचनालयाच्या सदस्या प्रतिभा वाघ यांनी केले.






