जामनेर, 2 ऑगस्ट: आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शालकाने मेहुण्यावर जंगलात नेऊन प्राणघातक हल्ला केल्याची घटना आता खुनाच्या गुन्ह्यात परिवर्तित झाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रशांत सुभाष चौधरी (वय २६, रा. फत्तेपूर, ता. जामनेर) याचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
नेमकं काय प्रकरण? –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत चौधरी याने काही महिन्यांपूर्वी वडगाव सद्दो येथील एका तरुणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. या विवाहास तरुणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. विशेषतः तिचा भाऊ अभिषेक संतोष मोरे याने हा राग मनात ठेवून मेहुण्याचा जीव घेण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या दिवशी अभिषेकने प्रशांतला विश्वासात घेत तोरणाळा जंगल परिसरात नेले. तेथे दोघांनी मद्यपान केल्यानंतर संधी साधत त्याने मोठा दगड प्रशांतच्या डोक्यात घातल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेला प्रशांत रक्ताच्या थारोळ्यात पडला. तो मृत झाल्याचा समज करून संशयिताने त्याला जंगलातील खड्ड्यात टाकले. तसेच पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या अंगावर झाडांच्या फांद्या व पाने टाकून घटनास्थळावरून पलायन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
बेपत्ता तक्रारीनंतर उलगडला प्रकार –
प्रशांत रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र काहीच माहिती न मिळाल्याने त्याची आई सरला चौधरी यांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली असता तोरणाळा जंगल परिसरात प्रशांत गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.
त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संशयिताविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.






