ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑगस्ट: पाचोरा-भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शासकीय लाभार्थी कार्यक्रमांमध्ये सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार किशोर अप्पा पाटील आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण दिले जाते, तर इतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप करत विविध पक्षांनी एकत्र येत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
पाचोरा-भडगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय लाभार्थी कार्यक्रमांमध्ये भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जात नसल्याचा आरोप सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’तही कोणत्याही विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले नसल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाचा मोठा निधी खर्च करूनही लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय सहभागाशिवाय अशा कार्यक्रमांचा उद्देश पूर्ण होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
याप्रकरणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत भविष्यात सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना समान वागणूक देऊन शासकीय कार्यक्रमांना निमंत्रित करावे, अशी मागणी करण्यात आली.
या वेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, भाजप शहराध्यक्ष दीपक माने, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष परमेश्वर पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अनिल सांवत, रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दीपक राजपूत, भाजप भडगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील, विनोद नेरकर, युवा मोर्चाचे चेतन पाटील, योगेश ठाकूर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इरफान मणियार, ओबीसी सेल अध्यक्ष शरीफ शेख, सादिक मणियार यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा: पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू






