ईसा तडवी, प्रतिनिधी
आसनखेडा (पाचोरा), 11 ऑगस्ट: फार्मर कप २०२६ स्पर्धेअंतर्गत आसनखेडा खुर्द येथील क्रांतीज्योत महिला शेतकरी गटाच्या कापूस पिकाच्या शेताला भेट देत कृषी विभाग व पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी महिला शेतकऱ्यांना विविध तांत्रिक बाबींचे नुकतेच मार्गदर्शन केले.
यावेळी कापूस पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय व एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, चिकट सापळे, फेरोमोन ट्रॅप तसेच पक्षी थांबे यांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच कापूस पिकातील शेंडे खुडणे, शाखीय फांद्या काढणे आणि त्यातून बोंडांचे वजन व उत्पादन वाढविण्याच्या पद्धतींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादनाचा दर्जा आणि उत्पन्न वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.
या भेटीदरम्यान मंडळ कृषी अधिकारी वाय. आर. जाधव, कृषी विभागाचे फार्मर कप मेंटर अभिजीत पाटील, पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप मेंटर तनुजा साळुंखे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी आर. ए. पाटील व प्रतीक्षा पवार उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी क्रांतीज्योत महिला शेतकरी गटाला फार्मर कप २०२६ स्पर्धेसाठी शुभेच्छा देत शाश्वत व पर्यावरणपूरक शेतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी






