ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 15 ऑगस्ट: सातगाव डोंगरी ते गहुले रस्त्यावरील अजिंठा डोंगरातून वाहत येणाऱ्या बामनी नदीवर पुल उभारण्यात यावा, अशी मागणी सातगाव डोंगरी येथील शिवसेनेचे उपगण प्रमुख तथा जिल्हा परिषद शालेय समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ भावसिंग परदेशी यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिवसेना कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी त्यांनी हे निवेदन दिले.
पावसाळ्यात बामनी नदीला पूर आल्यास सातगाव डोंगरी, गहुले तसेच सार्वे बु. परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करणे कठीण होते. तसेच नदीपलीकडील शेतकऱ्यांची गुरे-ढोरेही पुराचे पाणी ओसरेपर्यंत अडकून पडतात. त्यामुळे त्यांच्या चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. पुराच्या काळात नदी ओलांडताना जीवितहानीची शक्यताही असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गहुले गाव सातगाव ग्रुप ग्रामपंचायतीला जोडलेले असून गावातील आदिवासी बांधवांना पावसाळ्यात आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत दवाखान्यापर्यंत पोहोचणे अडचणीचे ठरते. तसेच गहुले येथील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी सातगाव येथे ये-जा करताना नदीवरील पूल नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
या सर्व बाबींचा विचार करून बामनी नदीवरील पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी गोकुळ परदेशी यांनी केली आहे. सातगाव शिवारातील गट क्रमांक १६ आणि सार्वे बु. प्र.पा. शिवारातील गट क्रमांक ४८/२० या नदीलगतच्या ठिकाणी पुल उभारण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.
हेही वाचा: तारखेडा बु. येथील बंद शेतरस्ता तातडीने सुरू करा; शेतकऱ्यांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना निवेदन






