जळगाव, 2 ऑक्टोबर: ज्येष्ठ नागरिक हे केवळ वयाने ज्येष्ठ नसून ते आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाची अमूल्य संपत्ती आहेत. ज्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात, त्या घरातील बालगोपालांना त्यांच्या अनुभवातून संस्कार, ज्ञान आणि जीवनमूल्यांची शिदोरी मिळत असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा आदर व सन्मान करणे ही आपली संस्कृती आणि सामाजिक जबाबदारी आहे, असा सूर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
शिरसोली येथील जिजामाता शैक्षणिक संस्थेत समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन तसेच सेवा संकल्प अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी शिरसोली शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नेत्र तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच जी.पी.टी.एम. (आजी-आजोबा, शिक्षक व मुले) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली.
सायंकाळी जिजामाता शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ, शिरसोली तसेच जिल्ह्यातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेस्कॉनचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, आप्पासाहेब जगतराव पाटील, ऍड.अरुण धांडे, प्रा. सुरेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ या प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले. यावेळी उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची शपथ घेतली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत डॉ. अनिरुद्ध साळुंखे व डॉ. पाठक यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी प्राचार्य संभाजी देसाई, प्रा. सुरेश पांडे, आप्पासाहेब जगतराव पाटील आणि डी. टी. चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक, कौटुंबिक व राष्ट्रीय योगदान याबाबत मार्गदर्शन केले.
आभार प्रदर्शन प्राचार्य कल्पना प्रमोद पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे, निरीक्षक सुनील महाजन , वरिष्ठ लिपीक अरुण वाणी तसेच सर्व कार्यालय कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी परिषद घेतले.
हेही वाचा: दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर






