ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 28 ऑगस्ट: समाजातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे श्री साई समर्थ माध्यमिक विद्यालय, पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘नशा मुक्ति प्रतिज्ञा महाअभियान’ उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद मराठी शाळेच्या प्रांगणात करण्यात आले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी तिन्ही शाळांचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. ‘व्यसन सोडा, जीवन जोडा’, ‘नशामुक्त समाज, सुदृढ भारत’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारीज संस्थेच्या पाचोरा सेवा केंद्राच्या संचालिका बी. के. नंदादीदी होत्या. व्यसनामुळे केवळ व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होत नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार, चांगली संगत आणि रचनात्मक उपक्रमांचा आधार घेत व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. राजयोग व ध्यानामुळे मनोबल वाढण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. आर. पाटील यांनी व्यसनमुक्तीची सुरुवात शालेय वयापासूनच होणे आवश्यक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळ, कला व विविध उपक्रमांत सहभाग घ्यावा, तर पालकांनी मुलांच्या संगतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शालेय समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ परदेशी यांनी व्यसनमुक्ती ही केवळ एका व्यक्तीची किंवा संस्थेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. कुटुंबातील सकारात्मक वातावरण आणि पालकांचा संवाद यामुळे तरुणांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवता येते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती अनिता पाटील, शालेय समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ परदेशी, पत्रकार ईसा तडवी यांच्यासह तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार श्रीराम वानखेडे यांनी मानले.






