चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
लासगाव (पाचोरा), २७ ऑगस्ट: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ही ग्रामसभा साडेचार तासांहून अधिक काळ चालली. सकाळी १० वाजता सुरू झालेली ग्रामसभा दुपारी २.३० वाजेपर्यंत सुरू होती. ग्रामसभेच्या सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित करत सरपंच तथा प्रशासक, माजी सरपंच, ग्रामपंचायत लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, पाणीपुरवठा कर्मचारी तसेच शिपाई यांना प्रश्नांची सरबत्ती केली. त्यामुळे ग्रामसभेचे वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले.
शिवरे येथील ग्रामसेवकाच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) संघटनेने ग्रामसभांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. त्याचा परिणाम लासगाव ग्रामसभेवरही झाला. ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) प्रशांत पाटील हे ग्रामसभेला अनुपस्थित राहिले. त्यांच्या सूचनेनुसार लासगाव जि.प. मराठी शाळेचे मुख्याध्यापक महाले यांनी ग्रामसभेचे सचिव म्हणून काम पाहिले. त्यांनी सन २०२१ ते २०२६ या कालावधीतील जमा-खर्चाचा तसेच या कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या कामांचा आढावा वाचून दाखविला.
अध्यक्षपद स्वीकारण्यास प्रशासकांचा नकार –
ग्रामसभेच्या सुरुवातीलाच ग्रामस्थांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता सरपंच तथा प्रशासक मनिषा बडगुजर यांनी सुरुवातीला अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, ईद-ए-मिलादनिमित्त शासकीय सुट्टी असतानाही ग्रामसभेच्या पुर्व संध्येला ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीची आपल्याला कोणतीही माहिती नव्हती. आज ग्रामसभेला आल्यानंतर ऐनवेळी आपल्याकडे अध्यक्षपद देण्यात येत असल्याने आपण अध्यक्षपद स्वीकारू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.
हिशेबाची पुस्तके व बिले दाखविण्याची मागणी –
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे हिशेबाचे पुस्तक तसेच ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध कामांची बिले सादर करण्याची मागणी केली. मात्र, ग्रामसेवक अनुपस्थित असल्याने ही कागदपत्रे तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाहीत. त्यामुळे विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच नमुना क्रमांक ५ उपलब्ध झाल्याशिवाय ग्रामसभा नामंजूर करण्याबाबतही ठराव मांडण्यात आला.
पाणी, बसस्टॉपपासून घंटागाडीपर्यंत विविध प्रश्न –
गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही ग्रामसभेत विचारण्यात आला. नळांना किमान २० मिनिटे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बसस्टॉपचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. सध्या मंजूर झालेला बसस्टॉप पूर्वीच्या जागेवरच उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीमध्ये रोजगार सेवकाची भरती करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये गुरांसाठी चारा भरला जात असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून देत हे कॉम्प्लेक्स मोकळे करून देण्याची मागणी केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी बंद असलेली घंटागाडी सुरू करण्याची मागणीही करण्यात आली. घंटागाडीला सध्या चालक उपलब्ध नसल्याने गावातील इच्छुक चालकाला संधी देऊन घंटागाडी सुरू करण्याचे यावेळी ठरले. तसेच घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी केवळ ग्रामपंचायत लिपिकाचीच राहणार असल्याचे ठरविण्यात आले.
रोजगार हमी विहिरीतील ३० हजारांच्या मागणीची चौकशी –
रोजगार हमी विहीर योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा मुद्दाही ग्रामसभेत उपस्थित झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. गावातील जंगल मेंढपाळांना विकू नये अथवा त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोणताही मोबदला घेऊ नये, अशी मागणीही करण्यात आली. ग्रामपंचायतीत उपलब्ध असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’तून ग्रामस्थांना सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
तरुणांच्या भरतीच्या तयारीसाठी 8 लाखांचा निधी –
गावातील स्पर्धा परीक्षा व भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांसाठी मैदानाचा प्रश्नही ग्रामसभेत चर्चेला आला. भविष्यात ग्रामपंचायतीला मिळणारा जनसुविधा किंवा मूलभूत सुविधा अंतर्गत निधीपैकी ८ लाख रुपये तरुणांच्या मैदानासाठी वापरण्यात यावेत, असा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात आयुष्यमान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे तसेच बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या कामकाजासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
समाजमंदिराच्या कामावरूनही प्रश्नचिन्ह –
गावातील समाजमंदिराच्या कामाचा मुद्दाही ग्रामसभेत गाजला. समाजमंदिरावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्याप्रमाणात काम झालेले दिसून येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या कामाच्या खर्चाबाबत व प्रत्यक्ष झालेल्या कामाबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली.
सोलर प्रकल्पाचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत –
लासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पाचा मुद्दा ग्रामसभेत विशेष चर्चेचा ठरला. ग्रामस्थांनी आरोप केला की, सोलर प्रकल्पासाठी जागा देण्याबाबत ग्रामपंचायतीने ग्रामसभा न घेता केवळ मासिक सभेत ठराव मंजूर केला. प्रकल्पासाठी जागा दिल्यानंतर ग्रामपंचायतीला नेमका किती कर मिळतो, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही, असे ग्रामस्थ म्हणाले.
महाराष्ट्र शासनाकडून सोलर प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीला दरवर्षी पाच लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यास मंजुरी असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली. मात्र, आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या खात्यावर सोलर प्रकल्पाचे कोणतेही प्रोत्साहनपर अनुदान जमा झालेले नसल्याचे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले.
‘३०० युनिटपर्यंत मोफत वीज द्या; अन्यथा प्रकल्पाला कुलूप’ –
सोलर प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर, गावाला ३०० युनिटपर्यंत वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी प्रमुख मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच सोलर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळामध्ये लासगावमधील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि प्रकल्पाच्या बदल्यात ग्रामपंचायतीला प्रोत्साहनपर अनुदान मिळावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दरम्यान, या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास सोलर प्रकल्पाला कुलूप लावून प्रकल्प बंद करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. या मागणीला ग्रामपंचायतीचीही सहमती असल्याचे ग्रामसभेत स्पष्ट करण्यात आले.
पाणीपुरवठा, बसस्टॉप, रोजगार, घंटागाडी, ग्रामपंचायतीचा कारभार, विविध कामांचे हिशेब, समाजमंदिर, सोलर प्रकल्प आणि ग्रामस्थांच्या विविध मूलभूत प्रश्नांवरून लासगावची ग्रामसभा गाजली.






