ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 18 सप्टेंबर: गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने आज शुक्रवारी (१८ सप्टेंबर) पहाटे धडक कारवाई केली. पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील गिरणा नदीपात्रात सकाळी ५ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी तब्बल २९ वाहने ताब्यात घेण्यात आली. वाहनांसह यंत्रसामुग्री व वाळूसाठा असा एकूण ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली आहे.
गिरणा नदीपात्रात महसूल-पोलिसांची पहाटेच धडक कारवाई –
गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस विभागाने संयुक्त कारवाईचे नियोजन केले होते. त्यानुसार शुक्रवारी पहाटे महसूल विभाग, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने कुरंगी नदीपात्रात अचानक धाड टाकली. कारवाईची चाहूल लागताच वाळू वाहतुकीत सहभागी असलेल्यांची धावपळ उडाली. मात्र, पथकाने कारवाई करत २९ वाहने ताब्यात घेतली.
तब्बल ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त –
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांमध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. वाहनांसोबतच यंत्रसामुग्री आणि वाळूसाठाही जप्त करण्यात आला आहे. या सर्व मुद्देमालाची एकत्रित अंदाजित किंमत ३ कोटी ६० लाख रुपये असल्याचे महसूल विभागाने नमूद केले आहे. ताब्यात घेण्यात आलेली सर्व वाहने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MAIDC) खत कारखाना येथील गोडाऊन परिसरात लावण्यात आली आहेत.
कारवाईनंतर संबंधित वाहनांचा पंचनामा तसेच इतर आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल कायदे तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी यापुढेही नियमित तपासणी व कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
यांनी केली कारवाई –
ही कारवाई उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, निवासी नायब तहसिलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर.डी. पाटील, नांद्रा मंडळ अधिकारी वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कु-हाड खु. भरत नन्नावरे, मंडळ अधिकारी पिंपळगाव बु. प्रकाश डहाके, मंडळ अधिकारी नगरदेवळा बु राहुल पवार, असे एकुण 5 मंडळ अधिकारी तसेच पहुर पोलीस स्टेशन, बोदवड पोलीस स्टेशन व त्यांचे अंतर्गत कर्मचारी व मंडळ अधिकारी, तहसिल कार्यालय, पाचोरा, ग्राम महसूल अधिकारी पाचोरा व भडगाव यांचे पथकाने केली.
हेही वाचा: सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे






