ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 सप्टेंबर: सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य आणि सुरक्षिततेसह त्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनु सारवान यांच्या अध्यक्षतेखाली पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजना व सेवा-सुविधांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या सेवा-सुविधा, शासन निर्णयांमधील तरतुदी, आरोग्य व सुरक्षिततेच्या उपाययोजना तसेच सेवेशी संबंधित विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार करण्यात आलेल्या नियुक्त्यांची माहितीही यावेळी घेण्यात आली. पाचोरा नगरपरिषदेने या योजनांच्या माध्यमातून केलेल्या कार्यवाहीसह सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या इतर लाभांची माहिती प्रशासनाने आयोगाच्या उपाध्यक्षांना दिली.

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना, शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि प्रलंबित मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सफाई कर्मचारी संघटना व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी नगरपरिषद प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.

बैठकीच्या प्रारंभी मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी पाचोरा नगरपरिषदेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या सेवा, कल्याण, आरोग्य व सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नगराध्यक्षा सुनिता किशोरआप्पा पाटील म्हणाल्या, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा कणा आहेत. त्यांच्या सेवा, आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणाला प्राधान्य देण्यासाठी पाचोरा नगरपरिषद कटिबद्ध आहे.”
यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे विशेष कार्य अधिकारी राजेश सोनवणे, नगराध्यक्षा सुनिता किशोरआप्पा पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, आरोग्य सभापती सतीष चेडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे, कर अधीक्षक दगडू मराठे, स्वच्छता निरीक्षक संजय गोयर, तुषार नकवाल यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध सफाई कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
हेही वाचा: जळगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न






