नवी मुंबई, 25 सप्टेंबर: राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती पीक उत्पादनातून काहीच उरण्याची परिस्थिती नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. बहुतांश भागात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, दुष्काळाची तीव्रता मोठी आहे. पिके मोठ्या प्रमाणात करपली असून शेतकऱ्यांच्या हाती काही येईल, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, पिकांच्या नुकसानीबरोबरच अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून जनावरांच्या चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपाययोजनांचे नियोजन सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
View this post on Instagram
आजच शासन निर्णय काढणार –
दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांना अधिकृतपणे सुरुवात करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा जीआर आजच काढण्यात येईल. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. मराठा क्रांतिसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 93 व्या जयंतीनिमित्त वडाळा येथे आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य केले.
मुख्यमंत्र्यांकडून शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा नुकताच दौरा केला. तसेच काल वाशिम व अमरावती जिल्ह्यांतील शेतांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.






