लासगाव (पाचोरा), 6 नोव्हेंबर: पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याचा प्रश्न ‘सुवर्ण खान्देश लाईव्ह’ने वृत्ताच्या माध्यमातून समोर आणला होता. या वृत्ताची ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेत स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्था केली आहे. या कार्यवाहीमुळे स्मशानभूमीतील प्रकाशाचा प्रश्न मार्गी लागला असून, ग्रामपंचायतीने नागरिकांच्या समस्येची दखल घेतल्याचे दिसून आले आहे.
नेमकं काय घडलं होतं? –
लासगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी एका ५२ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले होते. त्यांच्यावर रात्री ९ वाजता गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, स्मशानभूमीत पुरेसा प्रकाश नसल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांना ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडावे लागले होते. विशेष म्हणजे, स्मशानभूमीत हायमास्ट लॅम्पची सुविधा उपलब्ध असतानाही त्याचा प्रकाश अंत्यसंस्कारासाठी अपुरा पडत असल्याचे समोर आले होते.
या गंभीर समस्येकडे सुवर्ण खान्देश लाईव्हने वृत्ताच्या माध्यमातून ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने याची दखल घेत स्मशानभूमीत प्रकाशव्यवस्थेसाठी उपाययोजना केली. आता स्मशानभूमी परिसरात अतिरिक्त प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सुवर्ण खान्देश लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत कार्यवाही केल्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाचे अभिनंदन!
कबरस्तानातील प्रकाशव्यवस्थेचीही मागणी –
गावातील स्मशानभूमीतील प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता मुस्लिम बांधवांच्या कबरस्तानातील सुविधांचाही मुद्दा समोर आला आहे. रात्रीच्या वेळी कबरस्तानात आवश्यक प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांकडून करण्यात येत आहे. स्मशानभूमीप्रमाणेच कबरस्तानातही पुरेशा प्रकाशाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
“स्मशानभूमीतील प्रकाशव्यवस्था सुधारण्यासाठी दोन नवीन पोल उभारून त्यावर प्रत्येकी २० वॅटचे सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे दिवे बसविण्यात आले आहेत. यामुळे यापूर्वीच्या हायमास्ट लॅम्पसह आता स्मशानभूमीत एकूण तीन पोलच्या माध्यमातून प्रकाशव्यवस्था उपलब्ध झाली आहे. याशिवाय, आवश्यकतेनुसार आणखी अतिरिक्त प्रकाशव्यवस्था उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रयत्न केले जातील. तसेच, मुस्लिम बांधवांच्या मागणीची दखल घेऊन गावातील कबरस्तानातही लवकरच प्रकाशव्यवस्था उभारण्यात येईल.””
– प्रशांत पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, लासगाव
हेही वाचा: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ






