जळगाव, 2 ऑक्टोबर: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल आणि जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उप-योजना) अंतर्गत योजनांच्या सामाजिक परिणामांचे विश्लेषण’ या संशोधन प्रकल्पाच्या अहवालाचे प्रकाशन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते येथील शासकीय विश्रामगृहात नुकतेच करण्यात आले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या संशोधन प्रकल्पात चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यांतील ८७ पेसा गावांमधील एकूण ९,८९८ कुटुंबांचे सर्वेक्षण करून शासकीय योजनांची परिणामकारकता, लाभार्थ्यांना झालेला प्रत्यक्ष लाभ, सामाजिक व आर्थिक बदल, शिक्षण, रोजगार, उपजीविका, मूलभूत सुविधा तसेच महिला व युवकांचा सहभाग यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाच्या आधारे योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचना व शिफारशी या अहवालात मांडण्यात आल्या आहेत.
यावेळी ‘आदिमित्र’ प्रकल्पाबाबतही मंत्री प्रा. डॉ. अशोक वुईके यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संशोधनातून प्राप्त वस्तुनिष्ठ निष्कर्षांचा उपयोग आदिवासी विकासाच्या योजनांचे नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन अधिक प्रभावी करण्यासाठी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
प्रकाशन प्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे तसेच विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळेचे संचालक डॉ. उमेश गोगडिया, डॉ. प्रशांत सोनवणे, सहायक प्रा. विनेश पावरा व सहायक प्रा. विरेश पाटील उपस्थित होते.
हेही वाचा: दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर






