चोपडा, 21 ऑक्टोबर: चोपडा शहर पोलिसांनी एका धडक कारवाईत गुजरात मधील सुरत येथील एका २४ वर्षीय अट्टल गुन्हेगाराला बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. तपासात समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला आरोपी हा साधासुधा नसून त्याच्यावर गुजरातमध्ये ॲट्रॉसिटी, पोक्सो (POCSO), कलम ३०७ (हाफ मर्डर) आणि दरोड्यासारखे ५ गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत. चोपडा पोलिसांनी त्याच्याकडून १ गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे, एक स्विफ्ट डिझायर कार आणि ५ मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील धनवाडी रोडवरील ग्रामसेवक कॉलनी, शशिकांत नगर परिसरात करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुलाब कोळी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित तरुण पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कारमधून (क्र. GJ-05 RK-3127) संशयास्पद रितीने फिरत असताना पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले.
जयेश दिलीप पाटील (वय २४, रा. श्री जी नगर सोसायटी-०१, कपुदरा, सुरत, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे बाळगलेला १ लाख रुपये किमतीचा मॅगझीनसह गावठी कट्टा आणि ९ mm बनावटीची ४ जिवंत काडतुसे मिळून आली. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा पूर्वेतिहास तपासला असता, तो गुजरात मधील पोलिसांना विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
लाखांचा मुद्देमाल हस्तगत –
पोलिसांनी कारवाई दरम्यान खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
-
- स्विफ्ट डिझायर कार: किंमत अंदाजे ७,००,००० रुपये.
- गावठी कट्टा व काडतुसे: किंमत १,०४,००० रुपये.
- ५ मोबाईल व ४ सिमकार्ड: ओप्पो, रेडमी, एचएमडी आणि व्हिलॉन कंपनीचे मोबाईल ज्यांची किंमत २६,००० रुपये आहे.
या अट्टल गुन्हेगाराला अटक केल्यामुळे पोलिसांना मोठ्या गुन्ह्याचा सुगावा लागण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.






