जळगाव, 29 ऑक्टोबर: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (JDCC Bank) पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी आज 29 ऑक्टोबर रोजी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुमित पाटील यांची प्रतिक्रिया –
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील म्हणाले की, माझे वडील आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक कामाचा अनुभव मला लहानपणापासून जवळून बघायला मिळाला आहे. मी त्यांचा संपूर्ण कार्यकाळ अतिशय बारकाईने पाहत आलो असल्याने, माझ्यावर निवडणुकीचा किंवा कामाचा कोणताही ताण (बर्डन) असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उलट आम्ही इतरांवर प्रभाव पाडणारे (बर्डन देणारे) आहोत, दडपण घेणारे नाही!
दरम्यान, आमदार किशोर आप्पा पाटील साहेबांचा, म्हणजेच माझ्या वडिलांचा एक फार मोठा अनुभव आणि खंबीर साथ माझ्या पाठीशी आहे. त्यांचा हाच अनुभव मला जिल्हा बँकेच्या कारभारात नक्कीच फायद्याचा ठरेल. बँकेच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी अजून नवीन आणि अधिक उत्तम काम कसं करून घेता येईल, हाच माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न असेल.
“पूर्वजांनी जपलेल्या संस्था नवीन पिढीने अधिक चांगल्या चालवाव्यात” – आमदार किशोर आप्पा पाटील
सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या नवीन कायद्यानुसार, ज्या व्यक्तींनी सलग १० वर्षे संचालकपद भूषवले आहे, त्यांना आता पुन्हा निवडणूक लढता येणार नाही. या नियमामुळे आज संपूर्ण राज्यभरात जिथे जिथे १० वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलेले संचालक होते, ते सर्व या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर झाले आहेत.
मात्र, यामुळे आता नवीन तरुण पिढी, नवीन मतदार आणि उमेदवारांमध्ये एक वेगळे नवचैतन्य पाहायला मिळत आहे. आमच्या पूर्वजांनी ज्या पद्धतीने या सर्व सहकारी संस्था अत्यंत मेहनतीने जपल्या आणि सांभाळल्या, त्याच पद्धतीने किंबहुना त्यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने या नवीन तरुण पिढीने आगामी काळात काम करावे, अशा मी नवीन तरुण उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो.
सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल –
जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा आमदार किशोरआप्पा पाटील हे सलग १० वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींच्या कायदेशीर पात्रतेच्या नियमांमुळे यावेळच्या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता त्यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पाचोरा विकासो (विकास सोसायटी) गटातून निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली असून आज त्यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे येथील सहकार विभागाचे उपनिबंधक मनोज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशाल ठाकूर आणि व्ही. डी. पाटील सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
जिल्ह्यात राजकीय वारसदार निवडणुकीच्या रिंगणात –
या निवडणुकीत केवळ सुमित पाटीलच नव्हे, तर जिल्ह्यातील इतरही बलाढ्य राजकीय नेत्यांच्या सुपुत्रांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रताप पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे सुपुत्र विशाल देवकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यावेळची जिल्हा बँकेची निवडणूक ही चुरशीची होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
निवडणुकीचे पुढील वेळापत्रक –
जिल्हा बँकेच्या एकूण २१ संचालक पदांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे:
- उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत: २६ ते ३० ऑक्टोबर २०२६
- उमेदवारी अर्जांची छाननी: २ नोव्हेंबर
- नामनिर्देशित उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार: ३ नोव्हेंबर
- अर्ज मागे घेण्याची मुदत: ३ ते १७ नोव्हेंबरपर्यंत
- निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी आणि चिन्ह वाटप: १८ नोव्हेंबर
- मतदान तारीख: २९ नोव्हेंबर २०२६
- मतमोजणी आणि निकाल: ३० नोव्हेंबर २०२६






