जळगाव, 29 ऑक्टोबर: मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ काढू देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. जगदीश काशिनाथ जगदाळे (वय २७ वर्ष, वनरक्षक, जुनोने बीट, अहिरवाडी परिमंडळ, वनपरिक्षेत्र रावेर) असे लाचखोर लोकसेवकाचे नाव आहे.
नेमके प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील ४० वर्षीय तक्रारदार हे रावेर येथील रहिवासी असून त्यांचा अर्थमुव्हर्स एजन्सीचा व्यवसाय आहे व त्यांच्याकडे जेसीबी (JCB) मशीन आहे. तक्रारदार यांच्या एका परिचिताने रावेर येथील मंगरूळ धरणातून शेतीकामासाठी गाळ वाहतूक करण्याचा परवाना पाटबंधारे उपविभागाकडून मिळवला होता. हे गाळ काढण्याचे ठिकाण वनरक्षक जगदीश जगदाळे यांच्या कार्यक्षेत्रात येत होते.
जगदाळे याने कार्यक्षेत्रातून जेसीबीद्वारे गाळ काढल्याचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडे २०,००० रुपये आणि ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहतूक केल्याबद्दल त्यांच्या परिचिताकडे ३०,००० रुपये अशी एकूण ५०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रारदाराने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव एसीबीकडे रीतसर तक्रार दाखल केली.
एसीबीचा सापळा आणि कारवाई –
तक्रार प्राप्त झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने २८ ऑक्टोबर रोजी रावेर शहरातील छोरिया मार्केटमधील एका चहाच्या हॉटेलमध्ये पंचांसमक्ष लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी जगदाळे याने जेसीबी मशीनद्वारे गाळ काढल्याच्या मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच घेण्यास संमती दर्शवली.
त्यानंतर लगेचच रावेर ते बऱ्हाणपूर रोडवरील ‘साईनाथ ज्युस सेंटर’ येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना वनरक्षक जगदीश जगदाळे याला पथकाने रंगेहाथ पकडले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक –
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोउनि सुरेश पाटील,पोलीस हवालदार किशोर महाजन,पो.अं. भूषण पाटील, पो.अं. प्रणेश ठाकूर, पो.अं. राकेश दुसाने आणि पो.अं. मनोज पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.
View this post on Instagram






