चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 2 ऑक्टोबर: जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्याचा लाभ मिळविणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, अपात्र आणि मयत लाभार्थी वगळल्यानंतर पात्र गरजू नागरिकांसाठी प्राधान्य कुटुंब योजनेचा 1 लाख 12 हजार 97 लाभार्थ्यांचा नवीन इष्टांक उपलब्ध झाला आहे. तसेच अंत्योदय योजनेसाठी जिल्ह्यात 3 हजार 266 शिधापत्रिकांचा इष्टांक निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप रेशन धान्याचा लाभ मिळत नसलेल्या पात्र नागरिकांनी तहसील कार्यालय किंवा ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी केले आहे.
आयकर भरणाऱ्या 47 हजार 685 लाभार्थ्यी अपात्र –
महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागातर्फे सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) पारदर्शकता आणण्यासाठी ‘मिशन सुधार अभियान’ राज्यभर राबवले जात आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात रेशन धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी करताना प्रामुख्याने आयकर भरणाऱ्या 47 हजार 685 लाभार्थ्यांचा समावेश होता. यापैकी 31 ऑक्टोबरपर्यंत अनेक लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ बंद करण्यात आला असून, 22 हजार 292 लाभार्थ्यांबाबतची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. अपात्र शिधापत्रिकाधारक आणि मयत लाभार्थी वगळण्याची कार्यवाही सुरूच आहे. सध्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील याद्यांवर काम सुरू असून, ही प्रक्रिया 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. डिसेंबरपर्यंत पात्र लाभार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून, त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील कार्यवाहीही सुरू होणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी महेश चौधरी यांनी दिली आहे.
नवीन लाभार्थ्यांचा इष्टांक उपलब्ध –
दरम्यान, जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेसाठी नवीन लाभार्थ्यांचा इष्टांक उपलब्ध झाल्याने गरजू नागरिकांना रेशन धान्याचा लाभ मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांना संबंधित तहसील कार्यालयात ऑफलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच आरसीएमएस प्रणाली किंवा मेरा राशन ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासाठी रहिवासी पुरावा आणि आधारकार्ड आवश्यक आहे.
धान्याचा लाभ सुरू होण्यासाठी 45 दिवसांचा कालावधी –
रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे किंवा नवीन रेशनकार्ड मिळविण्यासाठीही नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर तालुका स्तरावरील डेटा एन्ट्री ऑपरेटर, पुरवठा निरीक्षक, तालुका पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या लॉगिनद्वारे पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते. पात्र लाभार्थ्याचे प्राधान्य कुटुंब रेशनकार्ड तयार होऊन त्याची पीडीएफ जनरेट झाल्यानंतर प्रत्यक्ष धान्याचा लाभ सुरू होण्यासाठी साधारणतः 45 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे पात्र आणि गरजू नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






