ईसा तडवी, प्रतिनिधी
कुऱ्हाड खु. (पाचोरा), 19 नोव्हेंबर: पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड परिसरातील वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या वरखेडी कक्षाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान वीज चोरीचे प्रकार आढळून आलेल्या ४३ संशयित ग्राहकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. महावितरणच्या या धडक मोहिमेमुळे परिसरातील वीज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरखेडी कक्षांतर्गत येणाऱ्या कुराड खुर्द तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये काही ग्राहकांकडून मीटरमध्ये छेडछाड करून, तर काहींकडून आकडे टाकून अनधिकृतपणे वीज वापरली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या माहितीच्या आधारे महावितरणच्या पथकाने संबंधित भागात तपासणी केली. त्यामध्ये अनधिकृत जोडण्यांद्वारे वीज वापरण्याचे प्रकार समोर आले. तपासणीदरम्यान ४३ संशयित ग्राहकांकडे वीज चोरी होत असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरोधात नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अनधिकृत जोडण्यांमुळे अपघाताचा धोका –
वीज चोरीमुळे महावितरणचे आर्थिक नुकसान होते. त्याचबरोबर अनधिकृत जोडण्यांमुळे वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार पडतो. परिणामी, परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत होण्यासह शॉर्टसर्किट आणि अन्य विद्युत अपघातांचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा त्रास नियमित वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांनाही सहन करावा लागतो. त्यामुळे वीज चोरी करणाऱ्यांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे.
यापुढेही मोहीम सुरूच राहणार –
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणचे विशेष पथक यापुढेही संबंधित गावांमध्ये तपासणी मोहीम सुरू ठेवणार आहे. अनधिकृत वीज जोडण्या आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या मोहिमेत सहाय्यक अभियंता आशिष बोंडे, सहाय्यक लेखापाल सुनील पवार, लिपिक प्रणय मोरे, मुख्य तंत्रज्ञ राजेंद्र राजपूत, प्रधान तंत्रज्ञ सुनील वानखेडे, वरिष्ठ तंत्रज्ञ हितेश गोराडे व तुषार पवार, तंत्रज्ञ गोपाल पाटील, महेश माळी व अल्केश मोहोर, बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ अंकुश कोळी, अनिरुद्ध अहिरे व रोशन पवार तसेच सुरक्षारक्षक राहुल बोरसे, अमोल बोरसे व अविनाश तेली यांनी सहभाग घेतला.






