ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 सप्टेंबर : गणेश उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरू असताना शहरा पासून 2 किमी अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्तुल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गौरव राजेंद्र पाटील (वय – २६ रा. गोराडखेडा ता. पाचोरा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? –
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे दर्ग्या जवळ एक तरुण कमरेला पिस्तुल लावुन फिरत असल्याची माहिती गुप्त सुत्रांकडून पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली होती. सदरची माहिती पो. कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदिप भोई, विनोद बेलदार यांचे पथक तयार करुन घटना स्थळाकडे रवाना केले.
पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयीत गौरव राजेंद्र पाटील याला पिस्तुल व जिवंत काडतुस सह शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची पिस्टल व 5 जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील 40 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सदर आरोपीवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे. दरम्यान, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळल्याने पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या सह तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.