मुंबई, 29 डिसेंबर : दुष्काळाग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण राज्यातील पीक कर्ज वसुलीसाठी महसूल विभागाकडून स्थगिती देण्यात आली आहे. दुष्काळ आणि दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 40 तालुक्यांमध्ये तसेच इतर तालुक्यांमधील 1021 महसुली मंडळांमध्ये काही दिवसांपूर्वी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. पण आता या भागातील पीक कर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सवलती लागू करण्याचे आदेश –
राज्यभरातील काही भागात सुरूवातीला अतिवृष्टी तसेच यानंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामध्ये ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के कमी पाऊस झाला, त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केला गेला. तसेच आता या दुष्काळी भागामध्ये उपाययोजना आणि सवलती लागू करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.
काय असणार सवलती? –
ज्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे, तिथे खालीलप्रमाणे सवलती देण्यात येतील, याविषयी देखील माहिती देण्यात आली आहे.
- जमीन महसूलात सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट
- शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी
- रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे