मुंबई, 10 जानेवारी : संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाला ज्या निकालाची उत्सुकता होती तो निकाल आता समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्र सुनावणी प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे म्हणून एकनाथ शिंदे सह सोळा आमदारांना अपात्र करता येणार नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितले. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांवर जोरदार टीका करत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले उद्धव ठाकरे –
सर्वोच्च न्यायालयाची चौकट धाब्यावर बसवली आणि जणूकाही आमच्यामागे महाशक्ती आहे. आम्ही सर्वोच्च न्यायलयालाही जुमानत नाही हे या निकालातून दिसून आले. महत्त्वाचा प्रश्न असा आहे, त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही. मूळ खटला हा अपात्रतेचा होता. जर तुम्ही आमची घटना मान्य करत नसाल, तर मग तुम्ही आम्हाला अपात्र का नाही केलंत, आणि त्यापलीकडे जाऊन त्यांनी जो निर्णय दिला आहे की, ही शिवसेना कुणाची आहे, महाराष्ट्रातलं लहान मूलही सांगू शकते, इतकं स्वच्छ आहे. पण निवडणूक आयोगाचा निकाल जो मूळात चुकीचा आहे, ज्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे, तोच त्यांनी ग्राह्य धरला.
म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे. डळमळीत आहे आणि या पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस, त्यांनी गाठलेला आहे. माझं कायद्याचं ज्ञान काही मोठं नाही. मला तर असं वाटतं की, सर्वोच्च न्यायालयाचा त्यांनी जो अपमान केला आहे, त्याच्याबाबत अवमान याचिका दाखल करता येते का, हे आम्ही पाहणार आहोत. त्यांना जे संरक्षण आहे, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला.
महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्वोच्च न्यायालयाला मी विनंती करतो की देशातील लोकशाही यांनी पायदळी तुडवली आहेच, पण आता सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्त्वसुद्धा शिल्लक राहणार आहे की नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने आता ठरवायचं आहे. जर आम्हाला यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करता येत नसेल, तर स्वत:हून ज्याला स्यू मोटो म्हणतात, अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का, अन्यथा आजपर्यंत जी प्रथा आहे, संविधानाप्रमाणे की कोणत्याही केसमध्ये, यापूर्वी उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात निकाल लागलेत, त्याप्रमाणे याप्रकरणाचा बरोबरी करुन निकाल दिला जातो. त्यावरुन हा निर्णय आता मान्य केला जाणार, की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य केला जाणार, ही गंभीर बाब आहे.
लोकशाहीचा खून करण्यासाठी कटकारस्थान चाललं आहे का? त्यांनी आरोपींची एकदा नाही दोनदा भेट घेतली. मात्र, आजच्या निकालामुळे लोकशाहीची हत्या त्यांनी केलीच, पक्षांतरबंदी कायदा मजबूत करण्याऐवजी पक्षांतराचा राजमार्ग कसा असावा हे त्यांनी दाखवला आहे. त्यांनी दोन चार पक्ष बदलले आहे. त्यांनी पक्षांतरं केली आहेत, त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा दूर करून घेतला असेल, अशी टीका ठाकरेंनी केली.
सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल, शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शिवसेनाही संपणार नाही, शिवसैनिक संपणार नाही –
शिवसेनाही संपणार नाही, शिवसैनिक संपणार नाही. देशातील जनता ही मिध्यांची शिवसेना मान्य करणार नाही. शिंदेंची शिवसेना ही शिवसेनाच होऊ शकत नाही, कारण त्यांचं नातं तुटलेलं आहे. नार्वेकरांनी जर दोन वेळा त्यांची भेट घेतली, त्यावेळेच हे फिक्स झालं होतं. आज मुख्यमंत्री हे दावोसला निघाले आहे, ही तर मॅच फिक्सिंग होती, अशी टीकाही ठाकरेंनी केली.