जळगाव, 15 जानेवारी : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गेल्या दीड वर्षापासून फरार असलेले जळगाव जिल्हा पोलिस दलाचे तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आज सोमवारी सकाळी पोलिस मुख्यालयात येऊन पोलिसांना शरण आल्याने त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, त्यांना जळगाव न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
बकालेंना 2 दिवस पोलिस कोठडी –
निलंबित पोलिस निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावरून मराठा समाज बांधवांकडून मोठा रोष व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान, त्यांना न्यायालयात आणण्यात येणार असल्याने तेथे मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, ऐनवेळी त्यांना न्यायाधीश केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आले आणि त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? –
जळगाव जिल्हा पोलिस दलात तत्कालीन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता बकाले यांनी अटकपूर्व जामिनासाठी जळगाव जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. तेव्हापासून ते फरार होते.
दरम्यान, बकालेंनी जळगाव जिल्हा न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज केला. तेथेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता. निलंबित निरीक्षक बकाले यांचा सुमारे दीड वर्षांपासून अधिक काळापासून शोध सुरू असतानाही ते यंत्रणेला सापडत नव्हते. मात्र, सर्व बाजूंनी त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे लक्षात येताच ते आज सकाळी पोलिस मुख्यालयात पोलिसांना शरण आले. दरम्यान, त्यांनी केलेल्या वादग्रस्त प्रकरणात त्यांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : जळगाव जिल्ह्यातील एकही आदिवासी लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून पासून वंचित राहू देणार नाही