नवी दिल्ली, 18 जानेवारी : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहे. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरातील रामभक्त त्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. संपूर्ण भारतात एक उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमामध्ये यजमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यातच आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी –
संपूर्ण देश राममय झाला आहे. याच धर्तीवर येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पवित्र सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची म्हणजे दुपारी अडीच वाजेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्व रामभक्तांना प्राणप्रतिष्ठापनाचा कार्यक्रम याची देही याची डोळा पाहता यावा, तसेच या कार्यक्रमाचे साक्षीदार होता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या तीव्र भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे पत्रात म्हटले आहे.
सध्या देशभरात श्रीरामांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व देशवासियांना फक्त 22 जानेवारीची प्रतीक्षा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक बड्या व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या सोहळ्यात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही सहभागी होणार आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.