मुंबई, 20 जानेवारी : देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार झाले असतानाच राज्यात मात्र ठाकरे गट व शरद पवार गटातील काही नेते तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, तपास यंत्रणांकडून केल्या जात असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात ईडी, सीबीआय या राष्ट्रीय तपास यंत्रणांनी राज्यात एन्ट्री केली आहे. राज्याच्या महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे खासदार राजन साळवी, मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
तपास यंत्रणांचे नेत्यांवर असलेले आरोप –
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून त्यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम साळवी यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात ईडीने समन्स जारी केले असून त्यांना 25 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना महामारिच्या काळात मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या बॉडी बॅग्जमध्ये घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काल (19 जानेवारी) ईडीने चौकशीसाठी 24 जानेवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेशी निगडित कथित घोटाळ्याप्रकरणात त्यांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीने बजावलेल्या समन्सनंतर आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून सूरज चव्हाण यांची ओळख आहे. कोविड काळात मुंबई महानगरपालिकेतल्या खिचडी घोटाळ्या प्रकरणात सूरज चव्हाण यांची ईडीकडून याआधी चौकशी करण्यात आली होती. सूरज चव्हाण यांनी आदित्य ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
हेही वाचा : मराठा आरक्षण : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही, मनोज जरांगे-पाटील भावूक