आंतरवाली (जालना), 20 जानेवारी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा मुंबईकडे मोर्चा निघणार आहे. दरम्यान, आज सकाळी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा त्यांची भूमिका स्पष्ठ केली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
मनोज जरांगे पाटील भावूक –
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे भावूक झाले आणि भर पत्रकार परिषेदत ढसाढसा रडले. मनोज जरांगे भावूक झाल्याचे पाहून उपस्थित आंदोलक देखील भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. स्वतःला सावरत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
अन्यायाचा कळस –
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, आमरण उपोषण आणि मुंबईकडे जाण्याची घोषणा करून एक महिना झाला तरीही सरकार गांभीर्याने घेत नाही. एवढा निर्दयीपणा यांच्या अंगात असणे म्हणजेच अन्यायाचा कळस झाला. त्यामुळे शेवटी आता मराठ्यांनाच शांततेच अस्त्र हातात घेऊन, यांचे कायमचे भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही.
जरांगेंचा जोरदार इशारा –
आपल्याच मुलांच्या नरड्यावर पाय द्यायचे यांनी ठरवले असेल, आपले मुले मोठे झाले नको पाहिजे असे यांनी ठरवले असेल, त्यामुळे यांचे राजकीय आयुष्य कायमचे सुपडासाप केल्याशिवाय चालणार नाही, असे जरांगे म्हणाले. यावेळी बोलताना जरांगे यांना अश्रू अनावर झाले आणि ते ढसाढसा रडल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा : सोलपूर येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक, क्षणभर भाषण थांबवलं अन्…