पाटणा, 28 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा होती. अखेर यातच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडी या पक्षासोबतची आघाडी मोडत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच हे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे केली. नितीश कुमार यांनी राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेऊन आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला.
राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार काय म्हणाले?
नितीश कुमार हे आरजेडी पक्षाशी काडीमोड करुन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करण्यात अशा चर्चा आहेत. यातच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आरजेडी पक्षासोबत आघाडी मोडली आहे. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला याबाबत खुलासा केला आहे.
आज मी राजीनामा दिला आहे. आरजेडीच्या व्यवहारांना तेथील जनता कंटाळली होती. राज्यातील जनता आनंदी नव्हती. पक्ष आणि जनमत लक्षात घेऊन मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असे नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
राज्यपाल काय म्हणाले?
तर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी नितीश कुमार यांचा राजीनामा स्वीकारला आणि पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्य करण्यास सांगितले.
असे आहे बिहार विधानसभेचे पक्षीय बलाबल –
दरम्यान, बिहार विधानसभेत जेडीयूकडे 45 आमदार आहेत. तर भाजपकडे 76 आणि जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाकडे 4 आमदार आहेत. अशा स्थितीत तिन्ही पक्षांकडे मिळून 125 आमदार होतात आणि बिहारमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांची आवश्यकता आहे. असे असताना बहुमतापेक्षा तीन आमदार अधिक एनडीएकडे असतील.
दुसरीकडे नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. नितीश कुमार यांना यावेळी पलटी मारणं महागात पडेल असे ते म्हणाले. जदयू प्रमुख नितीश कुमार यांच्या बैठका सुरू असताना आरजेडी प्रमुख लालु प्रसाद यादव यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काळात आणखी काय काय घडामोडी घडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.