अमळनेर (जळगाव), 4 फेब्रुवारी : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज समारोप झाला. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विकास मंत्री दीपक केसरकर यांनी महत्वाची घोषणा केली.
काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर? –
शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, विदर्भातील साहित्य मंडळाला दहा कोटी रूपये देण्यात येणार आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात छोटी- छोटी संमेलने झाली पाहिजेत. वेगवेगळी संमेलन न भरविता सर्वांनी एकाच व्यासपीठावर राहणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी जे जे काही करता येईल. ते करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. परदेशात व भारतातील इतर राज्यातील मराठी शाळांच्या संवर्धनासाठी शासन काम करत आहे.
अमळनेरला पुस्तकाचे गाव करणार –
मंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, साहित्य संमेलन हे शिखर संमेलन झाले पाहिजे. जिल्ह्यातील साहित्य संमेलनासाठी आवश्यक तेवढा निधी देण्यास शासन कटीबद्ध आहे. अमळनेरला पुस्तकाचे गाव करण्यात करण्यात येईल. साने गुरुजींना भारतरत्न पुरस्काराचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. नियतकालिकांसाठी आवश्यक निधी साहित्य महामंडळांना देण्यात येईल. मराठी साहित्यिक व भाषिकांशी संवाद साधण्यासाठी वॉररूम तयार केला जाईल. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, सार्वजनिक जीवनात आपल्या बोली भाषेत सातत्याने बोलणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडून महाराष्ट्रातील ग्रंथालयांच्या विकासासाठी 470 कोटी रूपये दिले जाणार आहेत. आतापर्यंत विधानसभेत 67 वेळा व विधानपरिषदेत 70 वेळा मराठी भाषेविषयी चर्चा झाल्या. वेगवेगळ्या माध्यमातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती –
समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शालेय शिक्षण व मराठी भाषा विकासमंत्री दिपक केसरकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, पुणे विद्यापीठ सिनेट कौन्सिल सदस्य राजेश पांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : अमळनेर येथील तत्वज्ञान केंद्र पुनर्विकास प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे