नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी : राज्यसभेतील जागा रिक्त झाल्याने राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. दरम्यान, या भाजपकडून महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांना भाजपने महाराष्ट्रात राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार, अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून याबाबत आज अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजीत गोपछडे यांनी उमेदवारी मिळाली आहे.
चंद्रकांत पाटील यांना पुण्यातील कोथरुडमधून आमदारकीला उतरवल्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज झाल्या होत्या. आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. तर दुसरीकडे डॉ. अजीत माधवराव गोपछडे हे मूळचे नांदेड येथील आहेत. लिंगायत ओबीसी असमार्या अजित गोपछडे यांनी संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. त्याशिवाय ते कारसेवक देखील आहेत. सध्या भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ते काम करत असताना त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपात पक्षप्रवेश