महेश पाटील, प्रतिनिधी
भडगाव, 24 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय भडगाव येथेच सुरू करावे याकरिता विविध सामाजिक संस्थांसह शहरातील सामान्य नागरिक देखील आग्रही आहेत. दरम्यान, यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनाला भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूकप्रमुख अमोल शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
भडगाव तालुका हा भौगोलिक दृष्ट्या इतर तालुक्यांच्या मध्यभागी आहे. तसेच ही कार्यालय भडगाव येथे आल्यास तालुक्याचा विकासासह आर्थिक व व्यावसायिक चालना भडगाव तालुक्याला मिळेल त्यासाठी भडगाव मधील सामाजिक संस्था व असंख्य नागरिक यांनी दि. 23 फेब्रुवारी शुक्रवार रोजी रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलन केले आणि आपली आग्रही मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे मांडली व घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
अमोल शिंदे यांचा पाठिंबा –
भारतीय जनता पार्टीचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी भडगावकरांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून यासंदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सदर मागणी करू. तसेच भडगावकर जनतेने त्यांच्या आंदोलनाच्या ठरावात भडगाव तालुका व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय, सामाजिक व्यक्तीने आमच्या आंदोलनात सहभागी होऊ नये, असा ठराव केल्यामुळे सदर आंदोलनात मी सहभागी होऊ शकलो नाही, असे अमोल शिंदे यांनी सांगितले.
सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व आदिवासी प्रकल्प कार्यालय या विषयात स्वतः पाठपुरावा करून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लागेपर्यंत कटिबद्ध राहील, असे आश्वासन अमोल शिंदे यांनी दिले आहे.
हेही वाचा : लहान मुलांच्या भावविश्वाला आकार देतांना पालकांची भूमिका महत्वपूर्ण – वैशाली सुर्यवंशी