चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, 1 एप्रिल : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मद्य धोरण प्रकरणात अटकेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, केजरीवाल यांनी न्यायालयाकडे महत्वाची मागणी केली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरणात सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यापूर्वी, ईडीने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यानंतर केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
केजरीवाल यांनी केली ‘ही’ मागणी :
अरविंद केजरीवाल आता 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहणार आहेत. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर केजरीवाल यांनी वकिलाकडून कोठडीत पुस्तके, स्पेशल डाएट, औषधे आणि खुर्ची देण्यासाठी अर्ज केला आहे. केजरीवाल यांनी जेलमध्ये तीन पुस्तके घेऊन जाण्यासाठी मागणी केली असून केजरीवाल यांनी रामायण, भगवद्गीता आणि प्राईम मिनिस्टर डीसाईड ही तीन पुस्तके वाचण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी अर्ज केला आहे. यामध्ये पत्रकार नीरजा चौधरी लिखित पुस्तक प्राईम मिनिस्टर डिसाईड हे पुस्तक विशेष आहे. दरम्यान, न्यायालयाने अद्याप केजरीवाल यांना याबाबत परवानगी दिलेली नसल्याचे समजते.
काय आहे संपूर्ण प्रकरण? –
दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण प्रकरणात 21 मार्च रोजी ईडीने अटक केली होती आणि 28 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडीत पाठवण्यात आले होते. त्यानंतर ईडीने पुन्हा कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांची ईडी कोठडी 1 एप्रिलपर्यंत वाढवली होती. दरम्यान, आज पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने केजरीवालांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केजरीवाल यांना आता तिहार जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.