चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव/मुंबई, 2 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवली जात असताना जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेवर खासदार संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
गेल्या काही दिवसांपासून खासदार उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आज सकाळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मुंबईत भेट घेतली. यानंतर थोड्याच वेळाने ते राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल होत चर्चा केली.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –
खासदार उन्मेष पाटील यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ते लवकरच ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, खासदार उन्मेष पाटील यांची कामगिरी चांगली असताना त्यांची उमेदवारी कापली गेल्याने आम्हाला आश्चर्य वाटले. दरम्यान, उन्मेष पाटील अस्वस्थ असून ते त्यांच्यासह शेकडो सहकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. म्हणून त्यांच्या पक्षप्रवेशबद्दल उद्यापर्यंत माहित होईल, असे संजय राऊत माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.
उन्मेष पाटील काय म्हणाले? –
संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, संसदेच्या सभागृहात आम्ही सोबत काम केले असल्याने संजय राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी नेहमीप्रमाणे चर्चा होत असते. यानिमित्त मी आज त्यांच्यासोबत मुंबईत संवाद साधला. यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे, आणि ती जपण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे मी सविस्तरपणे लवकरच देणार, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले.
लवकरच ठाकरे गटात जाणार? –
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने तिकिट कापल्यामुळे खासदार उन्मेष पाटील हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. हा पक्षप्रवेश सोहळा आज किंवा उद्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हेही वाचा : जळगाव लोकसभा मतदारसंघात येणार ट्विस्ट? ठाकरे गटाची नवी रणनिती