चंद्रपूर, 8 एप्रिल : राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी सुरू झाल्याचे मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा –
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज सायंकाळी 4 वाजता मोरवा येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेसाठी मोरवा विमानतळालगत 16 एकर शेतात जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून प्रशासनाचेही याकडे लक्ष लागले आहे.
दहा वर्षानंतर चंद्रपुरात –
पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तसेच पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सभास्थळाची पाहणी केली. नरेंद्र मोदी हे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचार सभेकरिता चंद्रपूरात आले होते. ते त्यावेळी पंतप्रधान नव्हते. मात्र, त्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले व त्यानंतर मोदी हे पंतप्रधान झाले. आता जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरला येत असल्याने त्यांच्या या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : ‘…म्हणून मी भाजपमध्ये जात आहे,’ एकनाथ खडसे यांनी सांगितले पक्षप्रवेशाचे नेमके कारण