चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
चंद्रपुर, 8 एप्रिल : चंद्रपुर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यानिमित्त तब्बल 10 वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चंद्रपुरात आले. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कुणाचे कंत्राट कुणाला मिळणार, कुणाच्या खात्यात किती येणार यामध्ये महाराष्ट्राचे भविष्य खराब केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कुठलाही प्रकल्प असो, कमिशन द्या नाहीतर कामाला ब्रेक लावा, हेच सुरु होते.
महाविकास आघाडीवर हल्लाबोल-
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली, सिंचन प्रकल्प बंद केला. विदर्भ विकासासाठी मी समृद्धी महामार्ग लोकार्पण केले अन् त्याचाही काँग्रेसने विरोध केला होता. मराठवाड्यासाठी असणारी वॉटर ग्रीड योजना बंद त्यांनी केली. मुंबई मेट्रो, रिफायनरी बंद केले. गरिबांना घरे देणारी योजना ठप्प पाडली. कमिशनसाठी त्यांनी अनेक योजनांना विरोध केला असा आरोप करत पंतप्रधान मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे कौतुक –
राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि या सरकारचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सरकारने बंद पाडलेल्या योजना आमच्या सरकारने पुन्हा सुरू केल्या. राज्यात शिंदे-फडणवीस-पवारांचे सरकार रात्रंदिन काम करत आहे. लोक मोदी सरकारला आपले सरकार मानतात. मोदी गरीब परिवारात जन्माला येऊन देशाचा प्रधानमंत्री झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसवर जोरदार टीका –
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची भाषा लिहिली गेली आहे. त्यांचे खासदार भारताच्या विभागाजनाची धमकी देतात. त्यांना देशातील जनता स्विकारणार का असा प्रश्न उपस्थित करत जिथे सत्ता मिळेल तिथे मलाई खाऊ, अशी काँग्रेसची भूमिका असून त्यांनी देश तोडला असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. कडू कारलं साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार, असे मराठीतील म्हणीचे प्रमाण देत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
हेही वाचा : ‘खडसेंचा संबंध डायरेक्ट मोदी साहेबांशी-अमित शाहांशी,’ मंत्री गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?