चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
गांधीनगर, 20 एप्रिल : देशात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, काल गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पार्श्वभूमीवर त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे.
अमित सहा यांच्याकडे किती संपत्ती? –
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमदेवारी अर्जासोबत शपथपत्र दिले आहे. त्यात शहा यांनी त्यांच्याकडे असलेली संपत्ती आणि त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे याबाबत माहिती दिली. दरम्यान, अमित शहा यांच्याकडे स्वत:ची कारसुद्ध नाही आणि कॅश केवळ 24 हजार रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
अमित शहा यांनी शपथपत्रात नमूद केल्यानुसार, व्यवसाय म्हणून ते शेती करतात. अमित शहा हे सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये खासदारांचा पगार, घर-जमीन भाड्याचे उत्पन्न, शेतीचे उत्पन्न आणि शेअर लाभांश आहे. त्यांच्यावर 3 गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे.
गांधीनगरमधून लढवत आहेत निवडणूक –
देशात लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. त्यात गुजरातमधून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी काल त्यांचा उमदेवारी अर्ज दाखल केला. अमित शहा हे पुन्हा एकदा गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांना लालकृष्ण अडवाणी यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून येत शहा यांना केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
हेही वाचा : हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलणार? माधवी लता विरूद्ध असुदुद्दिन औवेसी यांच्यात होणार कट्टर लढत