चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
हैदराबाद, 18 एप्रिल : देशातला हायहोल्टेज मानला जाणारा हैदराबाद लोकसभा मतदारसंघ सध्या जोरदार चर्चेत आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर एमआयएमचे गेल्या 40 वर्षांपासून वर्चस्व राहिलेले आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत औवेसी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केलेल्या माधवी लता यांच्यामुळे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलणार का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोण आहेत माधवी लता? –
डॉ. माधवी लता ह्या विरिंची हॉस्पिटलच्या चेअरपर्सन असून त्या भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्त्या आहेत. माधवी लता सामाजिक कार्यकर्त्या असून भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांना हैदराबाद मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाली. माधवी लता लोपामुद्रा चॅरिटेबल ट्रस्ट आणि लतामा फाऊंडेशनच्या प्रमुख आहेत. ट्रस्ट आणि संस्थांच्या माध्यमातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्या काम करतात. माधवी लता सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असून हिंदुत्वावादी भूमिकांमुळे त्या सतत चर्चेत असतात.
माधवी लता यांना वाय प्लस सुरक्षा –
हैदराबाद मतदारसंघासाठी भाजपने पहिल्यांदाच महिला उमेदवार म्हणून माधवी लता यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर त्या प्रचारासाठी सक्रिया झाल्या. दरम्यान, भारतीय गुप्तचर संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार, केंद्रीय गृहमंत्रालायाने त्यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान केली आहे. देशातल्या हाय होल्टेज मतदारसंघात त्या भाजपच्या महिला उमेदवार असल्याने त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा असा आहे इतिहास –
हैदराबाद लोकसभा मतदारसंघ एमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 40 वर्षांपासून म्हणजेच 1984 पासून हा मतदारसंघ एमआयएमकडे आहे. असदुद्दीन औवेसी यांचे वडील सुलतान सलाऊद्दीन 1984 साली पहिल्यांदा हैदराबाद मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी 2004 पर्यंत म्हणजेच सलग 20 वर्ष या मतदारंसंघाचे प्रतिनिधित्व केले. यानंतर 2004 सालापासून ते आजपर्यंत म्हणजेच 20 वर्षांपासून असदुद्दीन ओवेसी हे खासदार म्हणून या मतदारसंघाचे काम पाहात आहेत. दरम्यान औवेसी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केलेल्या माधवी लता यांच्यामुळे हैदराबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बदलणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
असुदुद्दिन औवेसींना हरवणे मोठे आव्हान –
असुदुद्दिन औवेसी हे गेल्या 20 वर्षांपासून हैदराबादचे खासदार आहेत. तसेच हैदराबाद हा लोकसभा मतदारसंघ एमएआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या भगवत राव यांचा तब्बल 3 लाख मतांनी पराभव केला होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणूकीत भाजपने एक महिला डॅशिंग उमेदवाराला औवेसींच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवून मोठे आव्हान उभे केले आहे. मात्र, गेल्या 24 वर्षांपासून मतदारसंघावर पकड असलेल्या एमआयएमच्या औवेसींना मात देणे हे भाजपपुढे मोठे आव्हान मानले जात आहे.
हेही वाचा : खान्देशात महायुती विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, कोण-कोणाविरोधात लढणार; वाचा, एका क्लिकवर