चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 1 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 वर्षात देशाची प्रगती केली. आम्ही आरोपांना उत्तर न देता कामाने उत्तर देत आहोत. घरी बसलेल्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहत नाही. काम करणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्र उभा राहतो, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारकात अभिवादन केले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त माध्यमांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्रात मंगल कलश आला तो हा दिवस असून हुतात्मा स्मारकाकडे आल्यानंतर ऊर्जा प्रेरणा मिळते. 106 हुतात्म्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य असून राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिले, फुले, शाहू-आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा काम हे महाराष्ट्र करत आहे. गेल्या 2 वर्षात सामान्य लोकांच्या सरकारने अनेक योजनांना चालना दिली आहे. हे काम आम्ही महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्याचा प्रयत्न करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हुतात्मा स्मारकात अभिवादन –
महाराष्ट्र दिनानिमित्त आज मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्व 106 हुतात्म्यांना हुतात्म्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार यामिनी जाधव, राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होते.
हेही वाचा : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल, महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार?