ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 मे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची काल पाचोऱ्यात सभा पार पडली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महायुतीवर जोरदार टीका केली. दरम्यान, यावरून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना प्रत्युत्तर दिले. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड ही धर्मापेक्षा विकासावर केली, असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आमदार किशोर पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर पाटील माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडर हे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष असून आपला उमेदवार कसा श्रेष्ठ आहे, हे दाखवून देण्यासाठी त्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकांनी धर्मापेक्षा विकासावर निवड केली आहे. जीवनात असलेल्या अविभाज्य घटकांत गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बदल घडवून आणला आहे. याचा परिणाम म्हणजे आमूलाग्र बदल संपुर्ण भारतात दिसत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
विकास संपणार नाही –
आमदार किशोर पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत असताना, रेल्वे, विमानतळ, महामार्ग, आदी दळणवळणाच्या साधनांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मोदींच्या नेतृत्वात 6 हजार आणि मागील एका वर्षांपासून राज्य सरकारच्या माध्यमातून 6 हजार असे एकूण 12 हजार रूपयांची मदत ही शेतकऱ्यांना मिळते. यामुळे पंतप्रधान मोदींना किंवा आमच्या उमेदवारांना धर्मावर बोलण्याचा विषयच नाही. खरेतर, आमच्या नेत्यांना एक-दोन तास विकासावर बोलायचे झाल्यास तरी विकास संपणार नाही. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे बोलणे केवळ टीका-टिपणी असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, भाजप धार्मिक मुद्द्यावरूंन निवडणूक लढवत आहे. देशाात चौकशी यंत्रणांचा गैरवापर होत असून केंद्र सरकारकडून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी पाचोऱ्यातील सभेत केला.
हेही वाचा : महायुतीचे जागावाटप फायनल! कोणत्या मतदारसंघातून कोण लढतंय? वाचा, एका क्लिकवर