चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 3 मे : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपात भाजप, शिंदेंची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षात गेल्या दोन महिन्यांपासून जोरदार रस्सीखेच होती. अखेर, हा जागावाटपाचा तिढा सुटला असून महायुतीचा अंतिम फॉर्म्युला निश्चित झाला. यानिमित्ताने सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला –
लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजपला 28, शिवसेना शिंदे गट 15 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 तर रासपचे वाटेला एक जागा आली आहे. या जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ते खालीलप्रमाणे.

कोकणातील महायुतीचे उमेदवार –
मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पुर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई-दक्षिण, मुंबई-दक्षिण मध्य, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड अशा एकूण लोकसभेच्या 12 जागा कोकणात येतात. महायुतीचा फॉर्म्युला ठरत असताना तिनही पक्षांनी दावा सांगितल्याने सर्वात महत्वाचा तिढा कोकणात निर्माण झाला होता. मात्र, अखेरीस तो तिढा सुटून शिंदेंच्या शिवसेनेला 5 , भाजपला 6 तर अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार –
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक 6 जागा भाजपला मिळाल्या असून शिंदेंच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे उमेदवार –
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, बारामती, शिरूर, मावळ, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, हातकणंगले आणि माढा अशा एकूण 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये भाजप 6, शिवसेना 2 आणि अजित पवार गट 2 जागांवर निवडणूक लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपच्या वाटेला आल्या आहेत.

मराठवाड्यातील महायुतीचे उमेदवार –
छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना, नांदेड, धाराशीव, हिंगोली आणि लातूर अशा एकूण 8 लोकसभा मतदारसंघाचा समावेश मराठवाड्यात आहे. दरम्यान, मराठवाड्यात भाजपला 4, शिवसेनेला 2, अजित पवार गटाला 1 आणि रासपला 1 इतक्या जागा मिळाल्या आहेत.

विदर्भातील महायुतीचे उमेदवार –
नागपूर, अमरावती, रामटेक, अकोला, बुलढाणा, गडचिरोली-चिमूर, गोंदिया-भंडारा, वर्धा, यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर असा एकूण 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. विदर्भात भाजपला 7, शिवसेनेला 3 जागा मिळाल्या आहेत. विदर्भात सर्वाधिक 7 जागा भाजप लढवत असून शिवसेनेच्या वाटेला 3 जागा आल्या आहेत.

महायुतीचे 45 प्लसचे लक्ष्य –
लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यापासून महायुतीकडून 45 पेक्षा अधिक जागा जिंकून आणण्याचे लक्ष आहे. महायुतीतील नेत्यांकडून महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकून येणार असल्याचा दावा सतत करण्यात येत आहे. महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकून याव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीरसभांचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आहे.
जनतेचा कौल कुणाला? –
महायुतीकडून राम मंदिर, 370 कलम, डिजिटलायझेशन तसेच आर्थिक विकास, आदीमुद्द्यांवरून निवडणूक लढवली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देशातील बेरोजगारी, पक्ष फोडाफोडीचे राजकारण, केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया, राज्यातून बाहेर गेलेले उद्योगधंदे, कायदा व सुव्यवस्था यांसारख्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवली जात आहे. दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले असून तीन टप्पे बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेचा कौल हा महायुतीला की महाविकास आघाडीला हे जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील निवडणूकीच्या निकालांवरून स्पष्ठ होणार आहे.
हेही वाचा : फायनल यादी! जळगाव लोकसभेसाठी ‘हे’ उमेदवार आहे निवडणुकीच्या रिंगणात; वाचा, एका क्लिकवर