चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
रामदेववाडी (जळगाव), 8 मे : जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेव वाडी गावाजवळ काल संध्याकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या घटनेत आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात आता मृतांची संख्या चारवर पोहचल्याची मोठी अपडेट समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव पाचोरा रोडवरील रामदेववाडी गावाजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत भीषण अपघात झाला. दरम्यान, या अपघात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला तर मृत महिलेच्या भाचा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या तरूणाचा रात्री उशिराने मृत्यू झाला. वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (30), सोमेश सरदार चव्हाण (2), सोहन सरदार चव्हाण (7), आणि लक्ष्मण भास्कर राठोड (12), अशी मृतांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं? –
रामदेववाडी अपघात प्रकरणातील मृत महिला वत्सला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या. काल 7 मे रोजी त्या मुलगा सोहम व सोमेश चव्हाण आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांच्यासह दुचाकीने शिरसोली याठिकाणी जात होत्या. रामदेववाडी गावाच्या पुढे असलेल्या वनविभागाच्या गेटजवळ भरधाव कारने (क्र. एम.एच. 19 सी.व्ही. 6767) चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
दरम्यान, या अपघातात वत्सला व मुलगा सोमेश चव्हाण हे दोघे जागीच ठार झाले. तर सोहम चव्हाण याला शासकीय रुग्णालयात महाविद्यालय व आणल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गंभीर जखमी लक्ष्मण राठोडवर उपचार सुरु असताना त्याचा रात्री उशिराने मृत्यू झाला.
अपघातस्थळी तणाव –
अपघात इतका भीषण होता की, आलिशान कारच्या धडकेनंतर दुचाकीचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी दगडफेक आणि रास्तारोको करत जळगाव पाचोरा रस्त्यावरील वाहतूक अडवून ठेवली. यात पोलीस कर्मचारीही जखमी झाले. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.