चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 17 मे : शेतकऱ्यांना लुटण्याचे काम जिल्हा बँकेच्या माध्यमातून होत आहे. शेतकऱ्यांना लुटणारे हे चेअरमन कोण, लुटणाऱ्यांना गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याचा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जळगावात माध्यमांसोबत बोलताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.
काय म्हणाले उन्मेश पाटील? –
पीकविम्याच्या नावाने, राजकारणाच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचे पाप ते करत आहेत, ते पाप कुठेही फेडू शकणार नाही. शेतकऱ्यांच्या नावाने 1400 रूपये वसुली करतात. 1 रूपयाच्या विम्यासाठी तुम्ही 26 रूपये घेतात. प्रत्येक गोष्टीत शेतकऱ्यांची लुट केली जात आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या संचालकांना गिरीश महाजनांचा आश्रय असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या संदर्भात आक्रमकपणे पाऊले टाकेल आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या टोळीला मात्र शिवसेना शांत बसू देणार नाही, असा इशारा उन्मेश पाटील यांनी दिला.
लुटारू गँगचा म्होरके म्हणजे गिरीश महाजन –
मंत्री गिरीश महाजन डोळे आणि कान बंद करून बसले आहेत. या सगळ्या लुटारू गँगचा म्होरके म्हणजे गिरीश महाजन यांना मला प्रश्न विचारायचा की, जिल्हा बँकेवर तोडफोड करून तुम्ही सत्ता बसवली मात्र, शेतकऱ्यांच्या बाबीकडे का लक्ष देत नाहीत. संचालकांकडून पत्र दिले असतानाही तुम्ही संचालकांचे देखील ऐकत नाही. कुणाच्या आशीर्वादाने ही बँक चालतेय. मात्र, शिवसेना हे सहन करणार नाही, असा इशारा उन्मेश पाटील यांनी दिला.
एक नवीन पर्व निर्माण होईल –
शिवसेनेच्या माध्यमातून जळगावात एक नवीन पर्व निर्माण होईल, हा विश्वास आम्हाला आहे. एका-एका तालुक्यात एक लाखांचा लीड देणारे, आता काय करतील हे 4 तारखेला कळेलच. लोकांना भूलथापा देणाऱ्यांना आता कळून चुकले आहे. मतदारराजाने लोकशाहीचा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला असून यामध्ये प्रामाणिकपणे सज्जन शक्ती सक्रिय होऊन बदल करण्यासाठी त्यांनी मतदान केले असून तो बदल होईल, असा मला विश्वास असल्याचे उन्मेश पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा : कर्ज फेडण्यासाठी पैसे न दिल्याने 22 वर्षांच्या नातवाने केला आजीचा खून, पाचोरा तालुक्यातील हादरवणारी घटना