चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 14 जून : “मला माहिती पडलंय की, राज्यासह जळगाव जिल्ह्यात सगळ्या पदाधिकाऱ्यांची उलथापालथ होणार आहे. त्यामध्ये अमोल शिंदे याचा नंबर आहे. यामुळे मी शंभर दिवसांचा आमदार आहे, हे बोलण्यापेक्षा तु किती दिवसांचा तालुकाप्रमुख आहे, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे,” असे वक्तव्य आमदार किशोर पाटील यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
अमोल शिंदे यांनी काल पार पडलेल्या पत्रकार परिषदेत किशोर आप्पा यांचे नाव न घेता ते फक्त 100 दिवसांचे आमदार असल्याची टीका केली होती. दरम्यान, या टीकेला आज आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.
शिंदेंची उद्या हकालपट्टी करणार का? –
आमदार पाटील पुढे म्हणाले की, “अमोल शिंदे वारंवार पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर टीका करतात. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष तसेच गिरीश महाजन यांना थेट सवाल आहे की, शिंदेंना उद्या जर विधानसभा लढायची असेल तर मी त्यांच्यासोबत लढायला तयार आहे. मात्र, पहिल्यांदा भाजपने याचा खुलासा करणे गरजेचे आहे की, अमोल शिंदे हा त्यांच्या परवानगीने बोलतो का? कारण अमोल शिंहे हा माझ्यावर बोलतो म्हणजे युतीच्या सरकारच्या विरोधात तो बोलतोय. मी युतीचा सदस्य तसेच आमदार आणि युतीचा शासनाचा प्रतिनिधी आहे. आणि म्हणून तो जर तुमच्या परवानगीने बोलत नसेल तर त्याची उद्या हकालपट्टी करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आमदार पाटील यांचे शिंदे यांना थेट आव्हान –
अमोल शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाची आणि गिरीश भाऊंची ढाल सोबत घेऊन वार करण्यापेक्षा खुल्या पद्धतीने समोर यावं, असे माझे अमोल शिंदे यांना थेट आव्हान असल्याचेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. “तुझं आमदारकीचे स्वप्न हा मतदारसंघ पुर्ण होऊ देणार नाही, याची मला शंभर टक्के जाणीव आणि खात्री आहे. तु कितीही शेतकऱ्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न केला. पण जनता मुर्ख नाही. शेतकऱ्यांना आणि जनतेला माहितीये की, किशोर आप्पाची आणि जनतेची काय नाळ आहे, हे जनतेला शंभर टक्के माहिती आहे,” असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा : जिल्हा बँकेच्या ‘त्या’ निर्णयावर आमदार किशोर पाटील यांनी खुलासा करत अमोल शिंदेंवर साधला निशाणा