नवी दिल्ली, 4 जुलै : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बार्बाडोस येथे द. आफ्रिकेचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याची प्रतिक्षा संपुर्ण देशवासियांना होती. दरम्यान, प्रथमच टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. आज सकाळी टीम इंडियाचे दिल्ली विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर उपस्थित चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले.
दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार –
भारतीय क्रिकेट संघ आज सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाला. यावेळी दिल्ली विमानतळावरुन टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी विमानतळावरुन बाहेर पडताना रोहित शर्मा याने उपस्थित चाहत्यांच्या दिशेने पाहून विश्वचषक उंचावून दाखवला. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघातील सदस्य आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काही वेळ विश्रांती करणार आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय संघ आज सकाळी 11 वाजता भेट घेणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईत विजयी मिरवणूक –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ हा विमानाने मुंबईकडे रवाना होईल. साधरणतः दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुंबईत मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला असून बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या 125 कोटी रूपयांचे वितरण भारतीय संघाला केले जाणार आहे.
हेही वाचा : Accident News : दुचाकीच्या अपघातात तरूणाचा मृत्यू; दोन जखमी, पारोळा तालुक्यातील घटना