मुंबई, 4 जुलै : टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपुर्ण भारतवासियांना भारतीय संघ आपल्या देशात कधी दाखल होणार, याची प्रतिक्षा लागली होती. दरम्यान, आज टीम इंडियाचे दिल्लीत आगमन झाल्यानंतर खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर टीम इंडिया मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळतेय.
विजयी मिरवणुकीला होणार सुरूवात –
टीम इंडियाचे मुंबई विमानतळावर काही वेळापुर्वीच आगमन झाले असून थोड्याच वेळात विजयी मिरवणुकीला सुरूवात होणार आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हसह वानखेडे स्टेडियमवर लाखोंच्या संख्येने चाहते उपस्थित असून त्यांच्या जल्लोषाला उधाण आले आहे. दरम्यान, चाहते देखील विजयी मिरवणुकीच्या प्रतिक्षेत आहेत.
वानखेडे स्टेडियमवर जंगी सोहळा –
मुंबईत मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला असून बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या 125 कोटी रूपयांचे वितरण भारतीय संघाला केले जाणार आहे. दरम्यान, गर्दीवर नियंत्रण राहावे आणि मुंबईत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हेही वाचा : Breaking : टीम इंडिया भारतात दाखल, आज संध्याकाळी मुंबईत विजयी मिरवणूक, असे आहे नियोजन






