मुंबई, 27 जुलै : शिक्षणाचा दर्जा न सांभाळणाऱ्या शिक्षकांना आधी 6 महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि त्यातूनही दर्जा सुधारला नाही तर अशा शिक्षकांचा 50 टक्के पगार कापणार. मात्र, तरीही दर्जा सुधारला नाही तर सेवेतून कमी करणार, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक तसेच अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावे लागणार, असेही मंत्री केसरकर म्हणाले.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले? –
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, शिक्षक समाधानी असतील तरच ते विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देऊ शकतील. पुढील काळात शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर या सर्वांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावे लागणार आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही, यामुळे मुले निर्धास्त राहतात. त्याला गणित, विज्ञान, इंग्रजी येते की नाही याची चिंता कोणी करत नाही.
‘…..तर थेट सेवेतून दूर करणार’ –
म्हणून यापुढे शिक्षकांना ही मुभा राहणार नाहीये. अनेक शिक्षकांना लाख-सव्वा लाख पगार असतो. असे असताना मग मुलांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतापर्यंत ही जबाबदारी ठरवण्यात आली नव्हती. मात्र, आता मी असे देखील सर्क्युलर काढले आहे की, ज्या शिक्षकांना शिकवता येत नसेल त्यांना 6 महिने पूर्ण पगार देऊन प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतरही बदल झाला नाही तर 50 टक्के पगार कमी करणार आणि तरीही बदल झाला नाही तर थेट सेवेतून दूर करणार, अशा स्पष्ठ शब्दात मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षकांनी मुलांना गुणवत्तापुर्ण शिक्षण द्यावे याबाबत सांगितले.
‘त्या’ शिक्षकांवर कारवाई करणार –
केसरकर पुढे म्हणाले की, सेवेतून दूर करणे हा हेतू नाही. मुलांचे शिक्षण हे शिक्षण खात्याचे अंतिम उद्दिष्ट होते. आतापर्यंत हे शिक्षण नाही तर शिक्षक खाते होते. त्यांच्या समस्या घेऊन ते सरकारकडे जात होते. त्यांच्या समस्या वर्षभरात सोडवण्यात आल्या असून शिक्षकाने एकाच ठिकाणी राहून शिक्षणाचे काम कर्म करावे. शिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यावर जे शिक्षक यात कमी पडतील त्यांच्यावर कारवाई करणार, असही ते म्हणाले.
हेही वाचा : श्रमिक आधार पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत दुसाने यांची नियुक्ती