नवी दिल्ली, 2 ऑगस्ट : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी ईडीच्या छापेमारीबाबत मोठा दावा करत एक ट्विट केलंय. दरम्यान, या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. संसदेत 29 जुलै रोजी केलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय (ED) त्यांच्या घरावर छापा टाकण्याची योजना आखत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये केला आहे.
राहुल गांधींच्या ट्विटमध्ये नेमका दावा काय? –
खासदार राहुल गांधी यांनी आज ट्विटवर एक पोस्ट करत ईडीच्या छापेमारीबद्दल दावा केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटलंय की, “वरवर पाहता, माझं चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलेलं नाही. ईडीच्या आतल्या लोकांनी मला सांगितलं की, तुमच्या घरावर छापेमारीची तयारी केली जात आहे. मी आतुरतेनं ईडीची वाट पाहत आहे. मी स्वतःच्या हातानं त्यांना चहा आणि बिस्किटं खाऊ घालणार आहे.” दरम्यान, राहुल गांधी यांनी हे ट्वीट करत ईडीच्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग देखील केले आहे.
‘चक्रव्यूह’ संदर्भातील भाषणानंतर ट्विटरवर खळबळजनक दावा –
संसदेचे पावसाळी अधिवेशनात 29 जुलै रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता. देशातील शेतकरी, मजूर तसेच तरुण घाबरले आहेत. कमळाचे चिन्ह ठळकपणे प्रदर्शित केले आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी महाभारत युद्धातील चक्रव्यूह रचनेचा संदर्भ देत महाभारतातील चक्रव्यूहात भीती, हिंसाचार आहे आणि सहा जणांनी अभिमन्यूला अडकवून मारले. दरम्यान, त्यांनी चक्रव्यूहचे वर्णन पद्मव्यूह असे केले होते.
हेही वाचा : ‘संघावर बोलण्याची राऊतांची पात्रता आहे का?’, मंत्री गिरीश महाजन कडाडले, नेमकं काय म्हणाले?