संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 3 ऑगस्ट : पारोळा तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील वंजारी शिवारात असलेल्या असलेल्या भोकरबारी धरणाजवळ पीर बाबाचे दर्शन घेण्यासाठी पाच मुले आले होते. दरम्यान, दर्शन घेतल्यानंतर पाण्यात खेळण्यासाठी उतरलेल्या बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने यात तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये दोघं सख्या भावांचा तर एका आतेभावाचा समावेश आहे. या घटनेत दोघे जण पाण्यात न उतरल्याने सुदैवाने ते बचावले. दरम्यान, या ह्रदयद्रावक घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले मोहम्मद हसन रजा न्याय न्याज (वय 16), इजाज रजा न्याज मोहम्मद (वय 12), आश्रम पीर मोहम्मद (वय 9), इब्राहिम शेख अमीर (वय 14) तर आवेश रजा शेख मोहम्मद (वय 14, रा. मालेगाव जि नाशिक) हे पाचही जण आज दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरातून पारोळा शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीर बाबाच्या दर्शनासाठी गेले होते.
पाण्याचा अंदाज न आल्याने झाला घात –
दर्शन घेतल्यानंतर यातील हसन, इजाज व आवेश ही तिघे मुले धरणातील पाण्यात खेळण्यासाठी उतरले. विशेष म्हणजे पाचही जणांना कोणालाही पोहता येत नव्हते. परंतु फक्त किनाऱ्यावर खेळण्यासाठी उतरलेल्या तिघं बालकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, त्यामुळे एकापाठोपाठ एक पाण्यात घसरून बुडाले. पाण्याच्या जवळ उभी असलेले आश्रम पीर मोहम्मद व इब्राहिम शेख अमीर यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता ते वाचवू शकले नाही.
तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू –
मात्र, या दोघांनी लगेच वंजारी गावाकडे मदतीसाठी धाव घेतली घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर येथील स्थानिक नागरिक व प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, मुलांना पाण्यात बुडून उशीर झाल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला होता. यावेळी डॉ. प्रशांत रनाडे, डॉ. सुनील पारोचे, डॉ. गिरीश जोशी, मंगला त्रिवेणी, दीपक पाटील, प्रमोद सूर्यवंशी, प्रेम वानखडे यांनी शवविच्छेदन केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, बाळू गीते, भोकरबारी पोलीस पाटील ज्योती ज्ञानेश्वर बिरारी, शहर तलाठी निशिकांत माने, पोलीस हिरालाल पाटील, योगेश शिंदे आकाश माळी सुनील हाटकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, डॉक्टर संभाजी राजे पाटील माजी खासदार एटी नाना पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी सांत्वन पर भेट दिली.
हेही वाचा : 11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन, मामाकडे राहून शिकला अन् पारोळ्याचा प्रफुल झाला PSI, प्रेरणादायी स्टोरी