मुंबई, 4 ऑगस्ट : अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्यावतीने 596 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सरकारने विभागवार नुकसान झाल्यानुसार मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली होती. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसल्याने सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 596 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये सरकारने विभागवार नुकसान झाल्यानुसार मदत जाहीर करण्यात आली असून ती मिळणार आहे.
कोणत्या विभागासाठी किती मदत? –
- नाशिक विभागात 37 हजार 422 हेक्टरवरीला पिकांना फटका बसल्याने 73 हजार 567 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीपोटी सरकारने 108 कोटी 21 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
- अमरावती विभागातील 21 हजार 362 शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या विभागात 1 लाख 38 हजार 253 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने अमरावती विभागातील शेतकऱ्यांसाठी 382 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
- नागपूर विभागात 3 लाख 54 हजार 756 शेतखऱ्यांच्या 2 लाख 17 हजार 690 हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता. यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
- पुणे विभागात 2 हजार 297 शेतकऱ्यांचे 1 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं होते. या शेतकऱ्यांना 5 कोटी 83 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये –
नागपूर आणि अमरावती विभागातील शेतकऱ्यांना 482 कोटी रुपयांची मदत जाहीर झालीय. ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी मिळालेल्या निधीतून बँकांनी पीक कर्जाची वसुली करु नये, असे निर्देश देखील राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : Breaking : पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ तिघांचा बुडून मृत्यू, नेमकं काय घडलं?