जळगाव, 9 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना ताज्या असताना आणखी एकदा लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कामगार निरीक्षकाला तडजोडीअंती 36 हजार रूपयांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. चंद्रकांत पाटील (वय-57, रा. जळगाव) असे लाचखोर निरीक्षकाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय प्रकरण? –
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी असून ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून करत होते. तक्रारदार यांना मुकादम या पदावरून स्थगिती देण्यात आली होती. याप्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. दरम्यान, कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सदर सुनावणीचा निकाल सहाय्यक कामगार आयुक्त यांना सांगून लावून देतो, असे सांगत तक्रारदार यांना 50 हजारांची लाचेची मागणी केली.
एसीबीने पकडले रंगेहाथ –
दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे 5 ऑगस्ट रोजी तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणीसाठी काल गुरुवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी तडजोडी अंती 36 हजारांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी चंद्रकांत पाटील ( वय-57, रा. जळगाव ) यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! विनेश फोगाटचा कुस्तीला अलविदा, म्हणाली, “माझ्यात जास्त ताकद राहिलेली…”